Well Recharge Subsidy Plan विहीर पुनर्भरण अनुदान योजना

विहीर पुनर्भरण अनुदान योजना

विहिर पुनर्भरण (पोकरा अंतर्गत)

आपण नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प अंतर्गत विहीर पुनर्भरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

जमिनीवरील पाण्याचा साठा व भूजल साठा हे पाण्याचे दोन्ही साठी प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहेत पाऊसमान चांगले असल्यास जमिनीवरील पाणीसाठी जसे की धरणे, शेततळी, तलाव, इत्यादी तसेच पाणी शिरल्यामुळे भूजल साठ्यात वाढ होते. लोकसंख्या वाढ, शहरीकरण औद्योगीकरण, जमीन व पाण्याचे आरोग्य व्यवस्थापन, पाणी लागणाऱ्या पिकांखालील क्षेत्रात होत असलेली वाढ, भूजल पुनर्भरण यासाठीचे अपुरे प्रयत्न, नैसर्गिक रित्या ही भूजल पुनर्भरण कमी होणे, दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलाची वाढलेली मागणी या व अशा अनेक कारणांमुळे भूजल पातळी खोल गेलेली आहे. ज्या प्रमाणात भूजलाचा उपसा करण्यात येत आहे, त्याप्रमाणात भूजलाचे पुनर्भरण होत नाही. त्यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल गेलेली आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी जिरवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. सोबतच उपलब्ध असलेल्या भूजलाचा काटकसरीने व शास्त्रीय पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे.

सद्यस्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता व शेतकऱ्यांकडे पिकास संरक्षित सिंचन देण्याकरिता अस्तित्वातील विहिरीद्वारे पाण्याची उपलब्धता होण्याचे अनुषंगाने जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत भूजल पुनर्भरण याकरिता विहीर पुनर्भरण हे वैयक्तिक लाभाचे घटक राबविण्यात येत आहे.

विहीर पुनर्भरण योजनेची उद्दिष्ट:

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये सामाविष्ट करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

कृषी क्षेत्रात सिंचनासाठी अस्तित्वात असलेल्या विहिरीचे पुनर्भरण करून भूजलाच्या स्थितीत वाढ करणे.

दुष्काळग्रस्त भागांमध्ये जास्तीचा पाणी साठा जतन करणे व लोकांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारणे.

योजनेचे निकष :

प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेल्या अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यामध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी यांना प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येतो.

ज्या विहिरी बंद पडलेल्या आहेत, तसेच ज्यांची पाण्याची पातळी खोल गेलेली आहे, अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येतो.

या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून पूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा लाभ देण्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी.

विहीर पुनर्भरण योजनेसाठी अनुदान किती?

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विहीर पुनर्भरणसाठी अनुदानाचा तपशील खालील प्रमाणे असणार आहे.

(1) भारी जमीन पक्की विहिर रु. 11397/- अनुदान
2) हलकी जमीन व पक्की विहिर- रु.11797,/-.अनुदान
3) भारी जमीन व कच्ची विहिर- रु.12846/-अनुदान
4) हलकी जमीन व कच्ची विहिर- रु.13246/- अनुदान

यामध्ये प्रामुख्याने साठवण खडडा , शोष खड्डा, साठवण खड्ड्याकरिता इनलेट , साठवण खड्डा ते शोष खड्डा नाली, शोष खड्ड्या करिता आऊट्लेट ही कामे करावी लागतात.

अर्ज कुठे करावा? 

इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत

७/१२उतारा
८-अ प्रमाणपत्र

अंमलबजावणीची कार्यपद्धती:

1. इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर करावा.

2. मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेल्या तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य खरेदी करणे बंधनकारक राहील.

3. आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी लाभार्थ्याची राहील तसेच कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही.

4. निवडलेल्या लाभार्थींना त्यांच्या आवडीनुसार अनुभवी व्यक्ती किंवा संस्थेकडून सदरचे काम करण्याची मुभा असणार आहे.

5. काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे व देयके स्वसाक्षांकित करून ऑनलाईन अनुदान मागणी करावी.

6. उपविभागीय कृषी अधिकारी यांना ऑनलाइन पूर्व संमती दिल्यानंतर घटकाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.

अनुदान स्वरूप : जास्तीत जास्त १२,००० देय राहील.

लाभार्थी पात्रता :

1. ग्राम कृषि संजिवनी समितीने मान्यता दिलेले शेतकरी .

2. ज्या विहिरी बंद पडलेल्या आहेत तसेच ज्यांची पाण्याची पातळी खोल गेलेली आहे, असे शेतकरी यांना प्राधान्याने लाभ देण्यात येइल.

3. या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय नाही.

4. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी ऑनलाईन पुर्व संमती दिल्यानंतर लाभार्थींना त्यांच्या पसंतीनुसार अनुभवी व्यक्ती/संस्थे कडून सदर काम करण्याची मुभा आहे.

5. तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य खरेदी करणे बंधनकारक आहे.

6. अनुदान मिळणेसाठी देयके शेतकऱ्याने स्वतःचे स्वाक्षरी करून ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे.

7. ज्या विहिरी मधिल ऑक्टोबर महीन्यातील पाण्याची पातळी सरासरी 4 मिटर पेक्षा खाली असेल, अश्याच ठीकाणी ही योजना राबविण्यात येते, जेणेकरुन पावसाळ्यात विहिरिं मध्ये पाणी मुरविता येणे शक्य होइल.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top