School Uniform शिक्षण विभागाचा मोफत गणवेश वाटप निर्णयात मोठा बदल

शिक्षण विभागाचा मोफत गणवेश वाटप निर्णयात मोठा बदल

आठवड्यात दोन गणवेश

‘एक राज्य एक गणवेश’ या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या मोफत गणवेश (Uniform) वाटपाच्या निर्णयात शिक्षण विभागाने मोठा बदल केला आहे. नव्या शैक्षणिक वर्षामध्ये पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फतच देण्यात येणार आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासून शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एक समान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यासाठी निर्णयात काहीसा बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात यावा, यासाठी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी वितरीत करावा, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

शासन निर्णयात नेमकं काय बदल?

मोफत गणवेश योजनेंतर्गत अनेक शाळांनी आणि कापड उद्योजकांनी विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय सन 2023-24 या वर्षासाठीचे गणवेश तयार करण्याचे काम केले आहे. सदर तयार गणवेशामुळे संबंधिताचे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून शासनाने शाळा व्यवस्थापन समितीस उपलब्ध करुन दिलेल्या निधीमधून सन 2023-24 या शैक्षणिक वर्षांसाठी एक गणवेश शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात यावा. तर विद्यार्थ्यांना उर्वरित एक गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप (मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पैंट तसेच, मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची) शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात यावा,असे शासन निर्णयात सांगण्यात आले.

तीन दिवस शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या रंगाचा गणवेश परिधान करण्यात यावा.

स्काऊट आणि गाईड या विषयाच्या तासिका आठवडयातून दोन दिवस असतात. त्यापैकी एक तासिका शक्यतो शनिवारी असते. त्यामुळे मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी स्काऊट आणि गाईड विषयास अनुरूप उपलब्ध करुन देण्यात येणारा गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान करणे आवश्यक राहील. तसेच, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवस शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या रंगाचा गणवेश परिधान करण्यात यावा असे सांगण्यात आले आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच सन 2024-25 पासून शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एक समान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये मोफत गणवेश योजनेबाबत स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही करु नये. याबाबतच्या आवश्यक त्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील, असेही या शासन निर्णयात म्हटलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top