Grapes Cover Subsidy द्राक्ष बागांना प्लास्टिक कव्हर अनुदान योजना

द्राक्ष बागांना प्लास्टिक कव्हर अनुदान योजना

 

अवकाळी पाऊस व गारपीटी पासून द्राक्ष बागाचे संरक्षण होण्याकरता प्लास्टिक कव्हरसाठी अनुदान देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. 8 जिल्ह्यांमध्ये अनुदान वाटण्याकरता 6 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून प्लास्टिक कव्हर साठी अनुदान मिळण्यासाठी नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, अहमदनगर, जालना व सातारा जिल्ह्यातील शेतकरी पात्र असतील. या योजनेसाठी खर्चाचे मापदंड प्रति एकर 4,81,344 रुपये इतका निश्चित करण्यात आलेला आहे. प्रति लाभार्थी 20 गुंठे ते 1 एकर दरम्यान लाभ देय राहील. मात्र अनुदान मर्यादा खर्चाच्या 50% किंवा प्रति एकर 2,40,672 रुपये असेल.

या योजनेअंतर्गत शासनाकडून 50% अनुदान मिळणार असून उर्वरित 50% खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. या योजनेसाठी मंजूर निधीपैकी केंद्राचा हिस्सा 60% व राज्य शासनाचा हिस्सा 40% राहील. प्रकल्पांतर्गत लक्षांकाचे व निधीचे वाटप द्राक्ष पिकाच्या क्षेत्रानुसार जिल्हानिहाय मंडळ स्तरावर करण्यात येणार आहे.

अर्ज कोठे करायचा?

अनुदानासाठी शेतकऱ्यांना आधी महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावा लागणार आहे.

कागदपत्रे खालील प्रमाणे लागतील

1. द्राक्ष बागेच्या नोंदी सह सात बारा उतारा

2. 8 अ उतारा

3. आधार कार्डची छायांकित प्रत

4. आधार संलग्न बँक खाते पुस्तिकेच्या प्रथम पानाची छायांकित प्रत

5. अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील शेतकरी असल्यास जात प्रमाणपत्र

6. निश्चित केलेल्या नमुन्यातील हमीपत्र

7. बंद पत्र तसेच चतु:सीमा नकाशा

योजनेचा निकष:

द्राक्ष बागेत वाय सांडग्यावर प्लास्टिक कव्हर साठी एमएस अँगलचा पोल मध्यभागी वापरावा लागतो. त्याचा आकार कमीत कमी 30×30×5 mm (मिलिमीटर) असावा. तसेच पॉलिथिलीन पेपर व वाय आकाराचा सांगडा यात किमान 5 फूट लांबीचा अँगलच्या तुकड्याची जोडणी करावी. त्यामुळे बागेतील वेलीस अनुकूल वातावरण ठेवता येईल, असा मुख्य निकष या योजनेचा आहे.

एक एकर द्राक्ष पिकाकरिता प्लास्टिक कव्हरचा वापर करावयाचा असल्यास पेपरच्या संरक्षणासाठी पॉलिथिलिनच्या किमान 250 प्लास्टिक कॅपचा वापर करावा. युव्ही संस्करीत पॉलिथिलीन ओव्हन लॅमिनेटेड फॅब्रिकची प्लास्टिक कव्हरची जोडणी करण्यासाठी मधल्या व बाजूच्या युवी संस्करीत पॉलिथिन वायर 5 mm जाडीची वापरावी. प्लास्टिक पेपर व बाजूची पॉलिथिलिन वायर यांची जोडणी करण्यासाठी प्लास्टिक एस हुकचा वापर करावा. या योजनेचे इतर निकष समजून घेण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क करता येईल, असे फलोत्पादन विभागातून सांगण्यात आले.

राज्यातील द्राक्षबागांना केवळ नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळवून देण्याइतपत या योजनेचा हेतू नाही. ग्रामीण भागातील युवकांना कृषी क्षेत्रात स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा उद्देश फलोत्पादन विभागाने ठेवला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top