Dry Animal Fodder जनावरांच्या सुक्या चाऱ्याची योग्य साठवणूक कशी कराल?

Dry Animal Fodder :

जनावरांच्या सुक्या चाऱ्याची योग्य साठवण :

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सुक्या चाऱ्याची साठवणूक कशी करायची? कोरड्या चाऱ्याची पचनीयता, पौष्टिकता, चव वाढवून त्याचा पशुआहारात वापर केल्यास निश्‍चितच कमी चाऱ्यात जनावरांचे संगोपन करणे सोयीस्कर होईल.

पावसाळ्यात वेळेअभावी किंवा नकळतपणे जनावरांसाठी साठविलेल्या चाऱ्याकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत चारा आणि पशुखाद्याचा खर्च आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यातील अधिक वैरणीचा मुरघास करून किंवा सुकवून साठवून ठेवावी.

उपलब्ध चारा व शेतातील पिकांचे अवशेष जसे वाळलेले गवत, गव्हाचे काढ, भात पेंढा, तूर व हरभऱ्याचा भुसा, सोयाबीन कुटार, वाळलेली वैरण, इत्यादींची योग्य रीतीने साठवणूक करावी. त्याची पचनियता व पौष्टिकता वाढवणेसाठी त्यावर विविध प्रक्रिया कराव्यात.

आपल्याकडे अनेकदा शेतीतील पिकांचे वाळलेल्या अवशेषांना सुका चारा संबोधले जाते, परंतु पीक 50% फुलोऱ्यात आल्यावर, त्याची कापणी करून त्यातील जास्तीत जास्त पोषक मूल्ये आणि हिरवा रंग टिकवून ठेवण्यासाठी, सावलीत वाळवलेला चारा म्हणजे सुका चारा होय.

 

सुक्या चाऱ्याची योग्य साठवणूक खालील प्रमाणे करावी :

1. सुका चाऱ्याची साठवणूक करताना ज्यास्तीत ज्यास्त उंचीची गंज शक्यतो टाळावी. कारण असे न केल्यास तळाशी असलेले चाऱ्याची साठवण क्षमता खालावते, त्यातील अन्नद्रव्यांची गुणवत्ता कमी होते.

2. जेथे पावसाळ्यात पाणी साठवून राहणार नाही अशा ठिकाणी साठवण करावी.चारा साठवणूक जमिनीपासून 1 ते 2 फुट उंचीवर लाकडाचे ओंडके ठेऊन किंवा दगडांच्या साहाय्याने करावी. जेणे करून सहज पावसाच्या पाण्याचा निचरा होईल.

3. पूर्व तयारी म्हणून चारा साठवण्यासाठीची जमीन एकसारखी समांतर करून घ्यावी.

4. डंबेल शेप पद्धतीत चाऱ्याची साठवण करावी. शेवटचा थर हा योग्य पद्धतीने लावून घ्यावा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अणकुचीदार अवशेष वरती येणार नाहीत.

5. वातावरणातील घटकांपासून संरक्षण होण्यासाठी चारा चहूबाजुंनी झाकला जाईल यासाठी प्लॅस्टिक कागदाचा वापर करावा.

6. चारा साठवणूक ही संपूर्ण सूर्यप्रकाश उपलब्ध असेल अशा ठिकाणी करावी, जेणेकरून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आद्रतेमुळे बुरशीयुक्त घटकांची वाढ होणार नाही, चारा टिकण्यासाठी मदत होईल.

7. सुका चारा पचनास योग्य आणि अधिक पौष्टीक करण्यासाठी करावा लागणाऱ्या प्रक्रिया या साठवण करताना चाऱ्यामध्ये असणाऱ्या ओलाव्याचे प्रमाण यावरून कराव्यात.सुक्या चाऱ्यामध्ये ओलाव्याचे प्रमाण हे 20% पेक्षा कमी असावे, जेणेकरून कोणत्याही बुरशीच्या वाढीस योग्य वातावरण तयार होणार नाही. चारा हा चहूबाजुंनी व्यवस्थित झाकला जाईल याची दक्षता घ्यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top