Career After 10th दहावी नंतर शिक्षणाची संधी

दहावी नंतर शिक्षणाची संधी

 

दहावीतल्या मार्क्सवर करिअरची दिशा ठरत असते. दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला, की पुढे नेमक्या कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा, शिक्षणाची दिशा कशी ठेवायची, असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. दहावीनंतर कोणत्या शाखेला प्रवेश घ्यायचा, तांत्रिक शिक्षण घ्यायचं की पारंपरिक, याविषयीदेखील विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो. खरं तर दहावीनंतर पुढच्या शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांची माहिती घेऊ या. ‘स्टुडंट हॉल्ट डॉट कॉम’ने याबद्दलची माहिती दिली आहे.

दहावी उत्तीर्ण झालेले बहुतांश विद्यार्थी इयत्ता बारावी करणार असं उत्तर देतात. खरं तर दहावी झाल्यावर शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना बारावी करायची आहे, त्यांच्यासाठीदेखील काही पर्याय आहेत. काही विद्यार्थ्यांना दहावीनंतर शिक्षण आणि नोकरी अशा दोन्ही गोष्टी साध्य करायच्या असतात. असे विद्यार्थी दूरस्थ शिक्षणाचा पर्याय निवडू शकता. यात तुम्ही नोकरी करून शिक्षण घेऊ शकता.

आपल्याकडे दहावी झाल्यानंतर अनेक विद्यार्थी बारावीपर्यंत शिकण्याचा पर्याय निवडतात. सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स या तीनपैकी एका शाखेतून बारावी पूर्ण करून पुढे उच्च शिक्षण घेण्याचं विद्यार्थ्यांचं नियोजन असतं. इयत्ता बारावीसाठी अनेक विद्यार्थी सायन्स शाखेला पसंती देतात. गरज पडल्यास विद्यार्थी ग्रॅज्युएशनवेळी त्यांची ब्रांच बदलू शकतात.

सायन्स शाखेत प्रवेश घेतल्यास करिअरचे अनेक दरवाजे खुले होतात. डॉक्टर, इंजिनीअर, आयटी, संशोधन, एव्हिएशन, मर्चंट नेव्ही, फॉरेन्सिक सायन्स, एथिकल हँकिंग हे पर्याय सायन्स शाखेतून बारावी झाल्यास उपलब्ध होतात. सध्या सायन्स शाखा मेडिकल आणि नॉन-मेडिकल या दोन भागांत विभागली गेली आहे. यात भौतिक आणि रसायनशास्त्र हे दोन विषय सामाईक असतात. नॉन-मेडिकलमध्ये भौतिक, रसायनशास्त्रासोबत गणित हा विषय येतो. मेडिकलमध्ये भौतिक, रसायनशास्त्रासह बायोलॉजी हा विषय येतो. सायन्स शाखेतून बारावी झाल्यावर IIT, NIT, AIIMS यांसारख्या संस्थांमध्ये शिकण्याची संधी मिळते.

कॉमर्स शाखेचाही विचार करू शकता. कॉमर्स शाखेत अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, एमबीए, फायनान्शियल प्लॅनर, मॅनेजमेंट अकाउंटिंग, चार्टर्ड अकाउंटंट(CA), एक्चुअरीज हे करिअरचे पर्याय उपलब्ध आहेत. दहावीनंतर कॉमर्स घेतल्यास उपयोग होतो. कारण या शाखेत अनेक प्रोफेशनल कोर्सेस उपलब्ध आहेत.

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय नोकरी मिळवण्याचं ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आर्ट्स शाखा हा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण UPSC, MPSC सारख्या परीक्षांसाठी जो अभ्यासक्रम असतो, त्यांपैकी बहुतेकसा अभ्यासक्रम आर्ट्स शाखेत शिकवला जातो. याशिवाय आर्ट्स शाखेत शिक्षण घेतल्यास पत्रकार, ग्राफिक डिझायनर, वकील, इव्हेंट मॅनेजर, शिक्षण, अ‍ॅनिमेटर होऊ शकता. याशिवाय तुम्ही आर्ट्स शाखेत शिक्षण घेत असताना ब्लॉगिंग, यू-ट्यूबवर व्लॉगिंग, फ्रीलान्सिंग जॉब करून किंवा ऑनलाइन कमाईदेखील करू शकता. एखाद्या कोचिंग क्लासमध्ये शिक्षक म्हणूनही पार्टटाइम जॉब करू शकता.

इयत्ता दहावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना लवकर नोकरी मिळवायची आहे, असे विद्यार्थी आयटीआयचा कोर्स करू शकतात. हा कोर्स एक ते तीन वर्षं कालावधीचा असतो. यात तीन वर्षांचा एकच कोर्स असतो. अन्य कोर्स एक किंवा दोन वर्षांत पूर्ण होतात. आयटीआय करणाऱ्यांना ट्रेनी म्हणतात. आयटीआयमध्ये पंप ऑपरेटर, फिटर इंजिनीअरिंग, टूल अँड डाय मेकर इंजिनीअरिंग, फूटवेअर मॅन्युफॅक्चरर, रेफ्रिजरेशन इंजिनीअरिंग, फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.

आरोग्य क्षेत्रात काम करायचं असेल तर दहावीनंतर पॅरामेडिकल कोर्सचा पर्याय निवडू शकता. यासाठी नीट परीक्षा देण्याची गरज नाही. यात सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्स असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.

दहावीनंतर बारावी न करता थेट पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊ शकता. पॉलिटेक्निकचा कालावधी तीन वर्षांचा असतो. हा पूर्णतः टेक्निकल कोर्स असतो. पॉलिटेक्निकनंतर जॉब मिळण्याची शक्यता जास्त असते. पॉलिटेक्निक झाल्यावर थेट बीटेकच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊ शकता.

आर्ट अँड क्राफ्ट, सिरॅमिक अँड पॉटरी, डान्स, ड्रॉइंग, फर्निचर अँड इंटेरिअर डिझाइन, म्युझिक, स्कल्प्चर अशा कलेशी संबंधित विषयांमध्येही करिअर होऊ शकतं. मात्र त्यासाठी विषयाची आवड आणि कौशल्य लागतं. लहानपणापासून या विषयांचा अभ्यास केला तर त्यात करिअरसाठी उत्तम संधी आहेत.

बॅचलर इन डिझायनिंग – काळानुरुप प्रत्येक वस्तूचं डिझाइन बदलत राहतं. प्रत्येक वस्तू वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केली जाते. हे डिझाइन करण्यासाठी प्रोडक्ट डिझाइन, फर्निचर अँड इंटिरिअर डिझाइन, सिरॅमिक अँड ग्लास डिझाइन, ग्राफिक डिझाइन, अॅनिमेशन, व्हिडिओ कम्युनिकेशन अशा प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मात्र यासाठी केवळ चित्रकला पुरेशी नसून कल्पनाशक्तीची गरज असते.

सध्या कौशल्य विकासाला सर्वाधिक महत्त्व आहे. दहावीनंतर वेगवेगळ्या विषयांचे शॉर्टटर्म कोर्स करू शकता. यात सर्टिफिकेट आणि डिप्लोमा असे दोन कोर्स असतात. यानंतर तुम्ही एखादा छोटा जॉब करू शकता. इयत्ता दहावीनंतर सरकारी किंवा खासगी नोकरीही मिळू शकते; पण त्यासाठी तीव्र स्पर्धा असते. खासगी क्षेत्रात क्लार्क, डेटा एंट्री ऑपरेटर, आदी स्वरूपाचा जॉब मिळू शकतो. सैन्यदल, नौदल, हवाईदल, बीएसएफ, इंडियन रेल्वे, पोस्ट ऑफिस विभागातही नोकरी मिळवू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top